मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण

Survey of Dialects of the Marathi Language

  English | मराठी

मराठी भाषा / मराठी भाषेची यापूर्वीची सर्वेक्षणे

मराठी भाषेतील प्रमुख बोलीसर्वेक्षणे

मराठी ही भारतीय-युरोपीय भाषाकुळातील भाषा आहे. कोकणी, गुजराती, बंगाली ह्या याच भाषाकुळातील इतर काही भाषा. मराठी भाषेतील यापूर्वीची प्रमुख बोलीसर्वेक्षणे पुढीलप्रमाणे:

भारतीय भाषांची पहिली पाहणी केली ती ब्रिटीश अधिकारी सर जॉर्ज ग्रियरसन यांनी. (https://dsal.uchicago.edu/books/lsi/) अर्थात ही पाहणी प्रशासकीय गरज म्हणून केली होती. इ.स.१९०३ ते १९२८ या काळात ग्रियरसनने भारतातील चारही भाषाकुटुंबातील सुमारे ३६४ भाषांचे १९ खंडांच्या स्वरूपात जतन केले. यापैकी सातव्या खंडात मराठी (आर्य भाषाकुटुंबाच्या दक्षिण समूहातील भाषा) आणि तिच्या बोलींचे सविस्तर विवेचन केले आहे. सर्वेक्षणापश्चात ग्रियरसनने असे निरीक्षण नोंदवले आहे की मराठी ही एक बऱ्यापैकी एकसंध भाषा असून कोकणी ही तिची एकमेव (महत्त्वाची) बोली आहे. धुळे-जळगाव भागातील अहिराणी / खान्देशीला आता मराठीची बोली समजले जाते. पण ग्रियरसनने तिचा मराठीची बोली म्हणून नाही तर भिली भाषांबरोबर Linguistic Survey of India म्हणजेच LSI च्या नवव्या खंडात समावेश केला आहे.

कोकणी आणि मराठी यांच्यातील परस्परसंबंध हा नेहमीच बऱ्यापैकी वादाचा विषय ठरला आहे. भाषाशास्त्रज्ञांचे या बाबतीत एकमत दिसत नाही. ग्रियरसनने याबाबतीत नोंदवलेले मत आपण यापूर्वी पाहिलेच. सुमित्र मंगेश कत्रे (ज्येष्ठ अभ्यासक आणि डेक्कन कॉलेजचे माजी संचालक) यांनी Formation of Konkani या पुस्तकात कोकणीच्या सहा (स्थानिक) प्रकारांचा आढावा घेतला आहे. त्यांनी अभ्यासाअंती असा निष्कर्ष काढला की कोकणी आणि मराठी हे दोन्ही भाषाप्रकार आर्य भाषाकुटुंबाच्या दक्षिण समूहाशीच संलग्न असले तरी कोकणी ही मराठीपेक्षा तीन भाषिक विशेषांच्या बाबतीत भिन्न आहे आणि म्हणून, त्यांच्या मते, कोकणी ही मराठीची बोली नसून ती एक स्वतंत्र भाषा होय. कत्रे यांचे डेक्कन कॉलेज मधील उत्तराधिकारी डॉ. अमृतराव घाटगे यांनी इ.स. १९६३ ते १९७६ या काळात A Survey of Dialects of Marathi हा प्रकल्प राबविला. या अंतर्गत नऊ पुस्तिकांचे प्रकाशन झाले : ‘अ सर्व्हे ऑफ मराठी डायलेक्ट्स’ या मालेतील कोंकणी ऑफ साउथ कॅनरा (१९६३), कुडाळी (१९६५), कुणबी ऑफ महाड (१९६६), कोचीन (१९६७), कोंकणी ऑफ काणकोण (१९६८), वारली ऑफ ठाणा (१९६९), मराठी ऑफ कासरगोड (१९७०), गावडी ऑफ गोवा (१९७२) व भिली ऑफ डांग्ज (१९७६) हे खंड आहेत. (http://surl.li/bzxhx) यावरून लक्षात येते की डॉ. घाटगे यांनी ग्रियरसनप्रमाणेच कोकणी ही मराठीची मुख्य बोली आहे असे गृहीत धरले होते.

१९९५ साली डॉ. रमेश धोंगडे यांनी राज्य मराठी विकास संस्था यांच्या आर्थिक साहाय्याने डेक्कन कॉलेजमध्ये एक बोली सर्वेक्षणाचा प्रकल्प राबविला. महाराष्ट्रातील आठ केंद्रे निश्चित करुन तेथील बोलींमधल्या शब्दसंपत्तीचा त्यांनी भाषाशास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला. साधारणपणे ३५ अर्थक्षेत्रांमधील एकूण २९०० शब्दांचा भौगोलिक प्रसार त्यांनी अभ्यासला. सदर अभ्यासात त्यांनी मराठीच्या बोली कोणत्या हे गृहीत धरलेले नाही.

यानंतरचे सर्वेक्षणे म्हणजे डॉ. गणेश देवी यांच्या कल्पनेतून साकारलेले ‘महाराष्ट्राचे लोकसर्वेक्षण’. हे ‘लोक’सर्वेक्षण होते. यामुळे यात जनसामन्यांच्या दृष्टिकोनातून ‘बोली’ असलेल्या महाराष्ट्रातील अंदाजे ५४ भाषाप्रकारांचा समावेश केला आहे. यात पारंपारिक पद्धतीने मराठीच्या बोली समजल्या जाणाऱ्या आगरी, अहिराणीसारख्या भाषाप्रकारांबरोबरच कोरकू, गोंडी सारखे इतर भाषाकुळातील भाषाप्रकार व निहालीसारख्या ‘विलग’ (language isolate) भाषेचा देखील समावेश केला आहे. शब्द आणि व्याकरण स्तरावरील विशेषांची माहिती व भाषाप्रकाराचा एक नमुना (उदा. एखादी गोष्टी) असे या ग्रंथाचे स्वरूप आहे.